जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ओवी कन्स्ट्रक्शनवर गुन्हा दाखल, दोन आरोपी अटक
फिर्यादीची पळवाट ? मुख्य आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांनीच ‘खोटी सही’ बतावणी करत स्वतःच तक्रार दाखल केल्याची ठेकेदारांसह राजकीय वर्तुळात चर्चा
ओवी कंट्रक्शनचे मालक आणि विक्रमगड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष (पिंका) निलेश रमेश पडवळे, यज्ञेश अंभीरे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भारत न्यूज मराठी, जव्हार प्रतिनिधी : तुळशीराम चौधरी
जव्हार नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीत सर्वच राजकीय नेते व्यस्त असताना कोट्यवधी रुपयांच्या अपहाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सतर्कतेमुळे मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा प्रयत्न उघडकीस आला असून २८ नोव्हेंबरच्या मध्यरात्री जव्हार पोलिस ठाण्यात ओवी कन्स्ट्रक्शनसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपी असणे अपेक्षित असलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचेच मुख्य बांधकाम अधिकारी ‘आमची सही खोटी आहे’ असा दावा करीत स्वतःच फिर्यादी बनल्याने संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या पळवाटीची चर्चा ठेकेदार व राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
घटनेविषयी पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, चेक क्रमांक ०६९२१८ हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालू खात्यातील चेक बुकचा नसून, या चेकवरील सही ना संबंधित बांधकाम अधिकाऱ्यांनी केली, ना अकाउंटंटने. अकाउंटंटने लेखी कळविल्यानंतर हा प्रकार समोर आला. चेकवरील दिनांक, हस्ताक्षर व सही हेही बनावट असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कार्यालयातील ही चेक पुस्तिका वरिष्ठ अर्थलिपिक अजिंक्य पाटील यांच्या ताब्यात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या बनावट चेकद्वारे तब्बल १,११,६३,३१,८१० (एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख एकतीस हजार आठशे दहा रुपये) इतकी मोठी रक्कम ओवी कन्स्ट्रक्शनच्या नावाने डिमांड ड्राफ्टद्वारे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा चेक ७ नोव्हेंबर २०२५ ची तारीख असलेला असून डिमांड ड्राफ्ट घेण्यासाठी ‘यज्ञेश अंभीरे’ हा इसम बँकेत आला होता. चेक न वठल्याने तपासासाठी ओवी कन्स्ट्रक्शनचे मालक निलेश रमेश पडवळे व त्यांच्यासोबत आणखी दोन जण बँकेत आल्याचे बँक व्यवस्थापकांनी पोलिसांना सांगितले. या तिघांवर संगनमत करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी ओवी कंट्रक्शनचे मालक आणि विक्रमगड नगर पंचायतीचे नगराध्यक्ष (पिंका) निलेश रमेश पडवळे, यज्ञेश अंभीरे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, एवढ्या मोठ्या रकमेच्या व्यवहारासाठी कोणीतरी ‘खोटी सही’ करेल का ? असा प्रश्न अनेक बांधकाम अधिकारी व कर्मचारी आपापसात विचारत असल्याचे समजते. ज्यांची सही चेकवर आहे आणि ज्यांची जबाबदारी आहे असे अधिकारी आरोपी होण्याऐवजी स्वतःच फिर्यादी बनत पळवाट काढत आहेत, असे मत ठेकेदार व राजकीय वर्तुळात जोरदार व्यक्त होत आहे. या सर्व प्रकारावर पडदा टाकण्यासाठी घाईघाईत गुन्हा दाखल करून विभाग स्वतःला वाचवत असल्याची टीकाही व्यक्त होत आहे.
जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्यात शिवसेनेचे उपनेते व जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचे मेव्हणे (पिंका) उर्फ निलेश फडवळे हे मुख्य आरोपी ठरविण्यात आले आहेत. मात्र संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्यास बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि मुख्य अधिकारी हेच प्रत्यक्षात मुख्य आरोपी असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये व राजकीय क्षेत्रात सुरू आहे.
जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील या प्रचंड आर्थिक गैरप्रकारामुळे विभागातील कार्यपद्धती, संगनमत आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रतिक्रिया
“आदिवासी भागात ओवी कन्स्ट्रक्शनने गेल्या सात–आठ वर्षांत केलेल्या सर्व कामांची चौकशी व्हावी. सार्वजनिक बांधकाम विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांची एसआयटीमार्फत सखोल चौकशी झाली तरच आदिवासी बांधवांना न्याय मिळू शकतो. इथला सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहे. त्यामुळे करण्यात आलेल्या सर्व कामांचे परीक्षण होणे अत्यावश्यक आहे.”
हरिश्चंद्र भोये, आमदार, विक्रमगड विधानसभा

0 Comments