जव्हार नगरपरिषदेत पत्नी नगराध्यक्ष, पती उपनगराध्यक्ष
जव्हार प्रतिनिधी : तुळशीराम चौधरी
जव्हार नगरपरिषदेत भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता आपल्या ताब्यात घेतली असून, पत्नी नगराध्यक्ष आणि पती उपनगराध्यक्ष अशी वेगळी राजकीय रचना तयार झाली आहे. पूजा उदावंत यांनी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला असून, कुणाल उदावंत यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आहे.
नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाने नगराध्यक्षासह एकूण १४ जागा जिंकून एकहाती वर्चस्व सिद्ध केले. शुक्रवारी आमदार हरिश्चंद्र भोये आणि भाजपाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांच्या उपस्थितीत पूजा उदावंत यांनी अधिकृतपणे नगराध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
याच दिवशी झालेल्या नगरपरिषदेच्या बैठकीत उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे कुणाल उदावंत यांना एकूण १८ मते मिळाली. यात भाजपाचे १४ नगरसेवक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ३ नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांचा समावेश होता.
त्यामुळे कुणाल उदावंत यांची उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. दरम्यान, स्वीकृत सदस्यपदी भाजपाच्या गीता चौधरी आणि विलास चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. शिंदेसेनेकडून दोन नगरसेवक निवडून आल्याने विरोधी पक्ष गटनेतेपदी पद्मा रजपूत यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एकमेव निवडून आलेल्या अश्विनी चव्हाण यांनाही विरोधी पक्ष नेतेपद देण्यात आले आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाने भाजपाला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे गटनेते इमरान मेमन यांची सभापतीपदी निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कार्यक्रमावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, सुरेखा थेतले, संतोष चोथे, बाबाजी काठोळे, दिलीप पटेकर यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, मुख्याधिकारी मानिनी कांबळे तसेच विरोधी पक्षातील नगरसेवकही उपस्थित होते. सत्तास्थापनेनंतर सर्व पक्षांच्या नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले.


0 Comments