Hot Posts

6/recent/ticker-posts

जव्हारमध्ये बचत गटांकडून दिवाळी फराळ विक्रीला सुरूवात

जव्हार पंचायत समितीसमोर घरगुती फराळ, साडी, तोरण, रांगोळी वस्तूंच्या स्टॉलला ग्राहकांचा प्रतिसाद

जव्हार : तुळशीराम चौधरी 

जव्हार तालुक्यातील महिला बचत गट आणि ग्रामीण जीवनोत्ती अभियान उमेद यांच्या माध्यमातून महिलांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घरगुती फराळ, साडी, रांगोळी, तोरण, दिवे अशा विविध वस्तू विक्रीसाठी स्टॉल लावले आहेत. पंचायत समितीसमोर सुरू झालेल्या या विक्रीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दिवाळी खरेदीसाठी जव्हार तालुक्यातील दहा महिला बचत गटांनी मिळून हे स्टॉल उभारले आहेत. महिलांनी स्वतः तयार केलेल्या घरगुती वस्तूंना विशेष मागणी दिसून येत आहे. फराळ, चिवडा, लाडू, करंजी, दिवे, तोरण, रांगोळी अशा घरगुती वस्तूंमध्ये पारंपारिक स्वाद आणि आकर्षकता असल्याने ग्राहकांची पावले आपोआप या स्टॉलकडे वळत आहेत.

उमेदच्या माध्यमातून महिलांना रोजगाराचा नवा मार्ग उपलब्ध झाला असून, घरगुती कौशल्याच्या जोरावर त्या स्वावलंबनाचा आदर्श निर्माण करत आहेत. आमच्या वस्तूंना घरगुती स्वाद आहे, त्या दर्जेदार आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत, त्यामुळे नागरिकांनी स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन बचत गटांच्या महिलांनी केले आहे.

या विक्री उपक्रमात वाळवंडा वनमाला महिला उत्पादक गट, हाडे उज्वला महिला बचत गट, गरदवाडी संजीवनी महिला बचत गट, झाप कीर्ती महिला उत्पादक गट, कोरतड मोगरा महिला उत्पादक गट, रमाबाई महिला बचत गट (न्याहाळे खुर्द), गुलाब महिला उत्पादक गट (आळेचीमेट), जय शिवाजी महिला बचत गट (वडोली), निसर्ग महिला उत्पादक गट (कुतूरविहीर) आणि अमृता महिला उत्पादक गट (धानोशी) या गटांचा समावेश आहे.

या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना रोजगाराची संधी तर मिळतेच, शिवाय पारंपारिक हस्तकलेला आणि घरगुती उद्योगांना चालना मिळत आहे. दिवाळीच्या आनंदात सहभागी होत जव्हार तालुक्यातील या महिलांनी स्वबळावर स्वावलंबनाचा दीप प्रज्वलित केला आहे.


Post a Comment

0 Comments