Hot Posts

6/recent/ticker-posts

ठक्कर बाप्पा योजना बंद ; आदिवासी भागातील विकास ठप्प, सरपंचांचे जव्हारमध्ये आमरण उपोषण



ठक्कर बाप्पा योजना बंद ; आदिवासी भागातील विकास ठप्प,  जव्हारमध्ये सरपंचांचे आमरण उपोषण

निधीअभावी रस्ते, पाणी, वस्ती सुधारणा रखडल्या ; योजना तातडीने पूर्ववत करण्याची मागणी

जव्हार प्रतिनिधी : तुळशीराम चौधरी 

आदिवासी विकास विभागाअंतर्गत राबवली जाणारी ठक्कर बाप्पा योजना बंद केल्यामुळे आदिवासी भागातील विकासकामे ठप्प झाली असून, या निर्णयाच्या निषेधार्थ पालघर जिल्ह्यातील चारही तालुक्यांतील सरपंच आक्रमक झाले आहेत. जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर शासनाविरोधात घोषणाबाजी करत सोमवार, २९ डिसेंबर २०२५ पासून सरपंचांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा या चार तालुक्यांचा समावेश जव्हार आदिवासी विकास प्रकल्पात होतो. या तालुक्यांतील आदिवासी वस्तींच्या मूलभूत विकासासाठी ठक्कर बाप्पा योजना महत्त्वाची दुवा ठरली होती. मात्र गेल्या चार वर्षांपासून ही योजना शासनाने बंद केल्यामुळे अनेक गावांतील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा आणि वस्ती सुधारणा यांसारखी कामे अर्धवट अवस्थेत आहेत. योजना सुरू असती तर अनेक गावांच्या मूलभूत समस्या सुटल्या असत्या, असा आरोप उपोषणकर्त्या सरपंचांनी केला आहे.

ठक्कर बाप्पा योजना बंद करून आदिवासी समाजाला पुन्हा विकासापासून दूर ठेवण्याचे काम सध्याचे सरकार करत असल्याचा आरोप करत, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर सरपंचांनी संताप व्यक्त केला. आदिवासी विकास विभागाकडे ठक्कर बाप्पा योजनेसाठी शासनाकडून निधीच उपलब्ध नाही का ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी निषेध नोंदवला. निधी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे जव्हार तालुक्यासह इतर तालुक्यांतील अनेक ग्रामपंचायतींची विकासकामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.

ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, वस्ती सुधारणा, समाज मंदिर उभारणी यांसारख्या मूलभूत कामांसाठी निधी अपेक्षित असतो. मात्र निधीच न मिळाल्याने ग्रामपंचायती अडचणीत सापडल्या असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. या नाराजीचे रूपांतर आंदोलनात झाले असून, सरपंचांनी सोमवारपासून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

निधी उपलब्ध होत नसेल तर योजना कशासाठी ? असा थेट सवाल शासनाला करत, ठक्कर बाप्पा योजना तातडीने पूर्ववत करावी आणि आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सरपंचांनी केली आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या उपोषणात सरपंच संघटनेचे अध्यक्ष एकनाथ दरोडा, सरपंच संदिप माळी, सरपंच कमळाकर धूम, सरपंच सुरेश फडवळे यांच्यासह अनेक महिला सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments