२० हजारांची लाच घेताना जव्हार मधील दोन तलाठी अटकेत
पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ; तीन दिवसांची पोलिस कोठडी
जव्हार प्रतिनिधी : तुळशीराम चौधरी
जव्हार तालुक्यातील हिरडपाडा, जामसर तसेच वावर-वांगणी तलाठी सजामधील दोन तलाठ्यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी रात्री उशीरा करण्यात आली असून, अटक करण्यात आलेल्या तलाठ्यांची नावे सीताराम इंधन आणि गजानन जोहरे अशी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, घरकुल बांधकामासाठी रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांकडून हे तलाठी नेहमीच पैशांची मागणी करत होते. दोन ट्रॅक्टरसाठी एकूण ४० हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. मात्र ट्रॅक्टर मालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने २० हजार रुपये आधी आणि उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले होते.
या त्रासाला कंटाळून काही ट्रॅक्टर मालकांनी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून बुधवारी रात्री २० हजार रुपयांची रोख रक्कम स्वीकारताना दोन्ही तलाठ्यांना अटक केली.
या तलाठ्यांकडून घरकुल लाभार्थी, ट्रॅक्टर चालक व मालकांना सातत्याने त्रास दिला जात असल्याची तक्रार होती. महसूल कर्मचाऱ्यांकडून कायद्याचा धाक दाखवून हफ्तेखोरी केली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू होती.
अटक केलेल्या दोन्ही तलाठ्यांना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईनंतर तालुक्यातील इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याची चर्चा आहे.
सध्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामे सुरू असून, रेतीशिवाय बांधकाम शक्य नाही. अशा परिस्थितीत जर गरीब लाभार्थ्यांना आणि वाहतूकदारांना सतत लाच द्यावी लागत असेल, तर सर्वसामान्यांनी घर बांधायचे कसे, असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
ही कारवाई ग्रामीण भागातील वाढत्या हफ्तेखोरीविरोधात महत्त्वाची ठरत असून, प्रामाणिक नागरिकांनी पुढे येऊन तक्रार केल्यास भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो, असे मत व्यक्त केले जात आहे.

0 Comments