शिक्षणाच्या बळावर गरीब मुलंही कुटुंबाचं नाव उज्वल करू शकतात - आमदार हरिश्चंद्र भोये
देहरे येथे ज्ञानज्योती सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचे उद्घाटन ; आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी नवे व्यासपीठ
जव्हार प्रतिनिधी : तुळशीराम चौधरी
आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलांमध्ये अपार गुणवत्ता असून योग्य मार्गदर्शन, संदर्भग्रंथ आणि अभ्यासाचे शांत वातावरण मिळाले, तर हीच मुलं शिक्षणाच्या जोरावर मेहनत, जिद्द आणि कष्टातून आपल्या आई-वडिलांचे व कुटुंबाचे नाव मोठे करू शकतात, असे प्रतिपादन आमदार हरिश्चंद्र भोये यांनी केले.
जव्हार तालुक्यातील देहेरे येथे रविवार, १ मार्च २०२६ रोजी ज्ञानज्योती सार्वजनिक वाचनालय व स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राचे उद्घाटन झाले. हे वाचनालय आमदार हरिश्चंद्र भोये यांच्या पत्नी ज्योतीताई भोये यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या स्वखर्चातून सुरू करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार भोये म्हणाले की, आदिवासी ग्रामीण भागातील एकत्र गावखेड्यांतील मुलांना जोडणारे, मध्यवर्ती ठिकाणी सुसज्ज वाचनालय आणि अभ्यास केंद्र उपलब्ध झाले, तर येथील विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससीसह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये निश्चित यश मिळवू शकतात.
आपल्या आदिवासी भागातून शिक्षण घेऊन अनेक युवक-युवती सुविधा नसतानाही मोठे अधिकारी झाले आहेत. आज काही प्रमाणात सुविधा उपलब्ध आहेत, त्यामुळे त्याचा योग्य उपयोग करून अजूनही अधिक विद्यार्थी उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांवर पोहोचू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाचे वातावरण मिळाल्यास ते राज्य व देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करतील, असेही त्यांनी सांगितले.
मला शिक्षणाची विशेष आवड आहे. शिक्षणाशी संबंधित कोणतीही अडचण असेल तर ती सांगा, आपण ती सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन देत त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीने गावोगावी अभ्यास केंद्रे आणि स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्रे उभारावीत, असे आवाहन केले. हे अध्ययन केंद्र विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी वाचन संस्कृती जपण्याचे महत्त्व अधोरेखित करत, आजच्या युवकांनी मोबाईल आणि सोशल मीडियाचा योग्य वापर करून अभ्यासाकडे आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीकडे लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले. या अध्ययन केंद्रात एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, बँकिंग, रेल्वे आदी विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक संदर्भग्रंथ, दैनिके, मासिके तसेच शांत अभ्यासाचे वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या उद्घाटन कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, जव्हार नगर परिषदेच्या नगराध्यक्षा पूजा कुणाल उदावंत, नायब तहसीलदार चंद्रकांत पवार, ज्येष्ठ नेते संतोष चोथे, सुशील औसरकर, तालुका अध्यक्ष प्रमोद कोठेकर, देहेरे ग्रामपंचायत सरपंच जितेश भोये यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments