Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपला निवडून द्या ; एका वर्षात जव्हारचे चित्र बदलू - पालकमंत्री गणेश नाईक

भाजपला निवडून द्या ; एका वर्षात जव्हारचे चित्र बदलू - पालकमंत्री गणेश नाईक

गांधी चौकातील जाहीर सभेत विकास योजनांची घोषणा ; स्थानिक नेतृत्वाची गरज अधोरेखित

भारत न्यूज मराठी, जव्हार प्रतिनिधी : तुळशीराम चौधरी 

मागील लोकप्रतिनिधींनी मतदारांच्या विश्वासाची किंमत राखली नाही, त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या ऐतिहासिक जव्हार शहराची हळूहळू अधोगती झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेसारखा आदर्श विकास जव्हारमध्ये शक्य असून त्यासाठी भाजपला एकदा संधी द्या, एका वर्षांत शहराचे चित्र बदलून टाकू, असे ठाम आश्वासन राज्याचे वनमंत्री व पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी जव्हारकरांना दिले. गांधी चौकात भाजपकडून आयोजित जाहीर सभेत त्यांनी पाणीपुरवठा, रस्ते, फॉरेस्ट सीमेत अडकलेली घरे अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलताना विकास आराखड्याची रूपरेषा समोर ठेवली.

नाईक म्हणाले की, “आजवर सर्व पक्षांना तुम्ही सत्ता दिली. मात्र जव्हारचा खरा विकास केला नाही. भाजपला एक संधी दिल्यास एका वर्षात शहराचे रूप पालटून जाईल. अनेक घरे फॉरेस्ट सीमेत अडकली असून निवडणूक झाल्यानंतर भाजपचा नगराध्यक्ष आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसह पहिल्याच आठवड्यात बैठक घेऊन या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढू.” याचबरोबर पाणीपुरवठा योजना आणि रस्त्यांच्या समस्या तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी जव्हार शहरासाठी ७५ लाखांची सुसज्ज रुग्णवाहिका देण्याची घोषणा करून उपस्थितांकडून टाळ्यांची दाद मिळवली.

सभेत आमदार हरिश्चंद्र भोये यांनी आक्रमक भाषण करत जव्हारकरांनी ७५ वर्षांनंतर स्थानिक आमदार निवडून दिला असल्याचे सांगितले. “आता तुम्हाला बाहेरच्यांचे ऐकून काम करणारा नगराध्यक्ष हवा आहे की स्वतःचा, जव्हारकरांचा नगराध्यक्ष हवा आहे, याचा विचार करा,” असे त्यांनी आवाहन केले. जव्हारचे डम्पिंग ग्राउंड, स्टेडियम, वाचनालय इमारत अशा कामांसाठीचा निधी मंजूर असूनही ठेकेदारांकडून कामे का होत नाहीत, यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शिवसेना (शिंदे गट) नेत्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करण्याच्या धमकीच्या क्लिप व्हायरल झाल्याचे सांगत, “अशा क्लिपपैकी एक जण कालच १११ कोटींच्या घोटाळ्यात अटक झालाय. आम्ही कोणाला घाबरत नाही. वाघाच्या जबड्यात हात घालून मोजितो दात अशी आमची जात,” असा आक्रमक इशारा भोये यांनी दिला. तसेच जव्हार अर्बन बँक ताब्यात घेऊन गोरगरिबांकडून सक्तीने वसुली सुरू करणाऱ्यांच्या हातात सत्ता देऊ नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.

यावेळी पालघर लोकसभेचे खासदार हेमंत सवरा यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विकासकामांचा उल्लेख करत नगरपरिषदेत अपेक्षित कामे न झाल्यामुळे शहराच्या प्रगतीला अडथळा निर्माण झाल्याचे सांगितले. “आपली कामे करून घेण्यासाठी हाच योग्य काळ आहे. हीच वेळ आहे भाजपचा नगराध्यक्ष निवडून देण्याची,” असे ते म्हणाले. डहाणू–जव्हार–नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगून, हा मार्ग वास्तव रूपात येण्याच्या स्थितीत असून जव्हारमध्येही विकासाची नवी दारे खुली होतील, असे त्यांनी नमूद केले.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा उदावंत यांनी प्रथमच जाहीर सभेत बोलताना, “मला काम करण्याची एक संधी द्या. शहर विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन,” असे आवाहन केले. या जाहीर सभेला भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.




Post a Comment

0 Comments