Hot Posts

6/recent/ticker-posts

अंधश्रद्धा-जादूटोणामुळे आदिवासी समाजाचा विकास खुंटतो


अंधश्रद्धा-जादूटोणामुळे आदिवासी समाजाचा विकास खुंटतो

जादूटोणा प्रथा प्रतिबंधक कायद्याविषयी आश्रमशाळांमध्ये मार्गदर्शन

भारत न्यूज मराठी, जव्हार प्रतिनिधी : तुळशीराम चौधरी

अंधश्रद्धा आणि जादूटोणा प्रथा यांमुळे आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास खुंटतो, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची जाणीव दृढ व्हावी आणि कायद्याविषयी सजगता निर्माण व्हावी, या उद्देशाने आदिवासी विकास प्रकल्प, जव्हारच्या वतीने सर्व शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये जादूटोणा विरोधी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत साखरे शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत नुकतेच शिबिर घेण्यात आले. विद्यार्थ्यांना जादूटोणा, भोंदूगिरी आणि अंधश्रद्धा ही केवळ फसवणूक असून कुटुंबांच्या विकासासाठी अडथळा ठरतात, याची माहिती देण्यात आली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शनाखाली समाजात प्रचलित अघोरी कृत्ये, निराधार जादूटोणा आणि भोंदूगिरी कशी लोकांची दिशाभूल करते, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती मिळाली. पालकांमध्ये अजूनही जादूटोणाविषयी जनजागृती नसल्याने या प्रथांमुळे अनेकांचे बळी गेले असल्याची उदाहरणेही विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली. त्यामुळे या प्रथा कायमस्वरूपी थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये योग्य व वैज्ञानिक विचारांचे बीज रुजवणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

या शिबिरात ‘जादूटोणा व अघोरी कृत्य प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २०१३’ याविषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून भोंदू लोक कशा युक्त्या वापरून साध्या गोष्टींना अलौकिक रूप देतात, हे दाखवून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दृढ करण्यात आला. अंधश्रद्धेतून निर्माण होणारा मानसिक ताण, कुटुंबांवर बसणारा पगडा आणि त्यामुळे विकास कसा खुंटतो, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार अंतर्गत एकूण 30 शासकीय व 18 अनुदानित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या मानसिक संतुलन, वैज्ञानिक दृष्टी आणि सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात असल्याची माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. या कार्यक्रमासाठी आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

“असा उपक्रम प्रकल्पातील सर्व आश्रमशाळांमध्ये राबविण्यात येणार असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक विचारांची वाढ, अंधश्रद्धेपासून संरक्षण तसेच मानसिक बळकटी निर्माण होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शैक्षणिक व जनजागृती कार्यक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे.”

डॉ. अपूर्वा बासुर (आय.ए.एस), प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार

Post a Comment

0 Comments