जव्हारच्या जयसागर धरण परिसरात घाण - कचऱ्याचे साम्राज्य ; स्वच्छता व सुरक्षेची तातडीची गरज
धरण परिसरात मद्यपान, कचरा यामुळे पाण्याची गुणवत्ता धोक्यात ; नागरिकांच्या तक्रारींकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष
भारत न्यूज मराठी, जव्हार प्रतिनिधी : तुळशीराम चौधरी
जव्हार शहराला पिण्याचे पाणी पुरवणारे अत्यंत महत्त्वाचे जयसागर धरण सध्या गंभीर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले आहे. धरण परिसरात सर्वत्र प्लास्टिक कचरा, दारूच्या बाटल्या यांचा साठा वाढत असून संध्याकाळच्या वेळेस काही मद्यपी व्यक्ती तसेच पर्यटक येथे येऊन खुलेआम पार्ट्या करत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे. वाढत्या अस्वच्छतेमुळे धरणातील जलस्रोत दूषित होण्याचा धोका निर्माण झाला असून शहराच्या आरोग्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे नागरिकांचे मत आहे.
धरणाकडे जाणाऱ्या मार्गांवर सुरक्षा यंत्रणा किंवा कंपाउंडची कोणतीही व्यवस्था नसल्याने दिवसाढवळ्या आणि रात्री मद्यपान, धिंगाणा आणि कचरा फेकण्याच्या घटना सुरूच आहेत. नागरिकांनी जव्हार नगरपरिषद प्रशासन आणि स्थानिक पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या तरी अद्याप प्रभावी कारवाई झाली नसल्याने शहरात नाराजी पसरली आहे. नियमितपणे भेट देणाऱ्या पर्यटकांनीही एवढे सुंदर पर्यटनस्थळ असूनही सर्वत्र कचरा आणि अस्वच्छता पाहून निषेध व्यक्त केला आहे.
जयसागर धरण शहरालगतच्या कॅचमेंट एरियामध्ये येत असल्याने येथे सुरू असलेले अतिक्रमण, अनधिकृत पार्ट्या आणि संशयास्पद हालचाली भविष्यात पाण्याचे स्रोत गंभीरपणे दूषित करू शकतात, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे स्वच्छता, सुरक्षा आणि संरक्षणात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर असून भविष्यात निवडून येणाऱ्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी या प्रश्नाला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
धरण परिसरात डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड आणि स्वच्छता उपक्रम राबवले जात असले तरी परिसराला गेट अथवा सुरक्षा व्यवस्थेअभावी रोज नवीन कचरा निर्माण होत असून या उपक्रमांवर पाणी फिरत आहे. धरण परिसराचे संवर्धन आणि संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करण्याची गरज असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
प्रतिक्रिया
“ जयसागर धरण परिसरात वाढत असलेल्या कचरा आणि मद्यपानाच्या प्रकारांवर तातडीने नियंत्रण करण्यासाठी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी नियमित कर्मचारी नेमून स्वच्छता व सुरक्षा सुनिश्चित करावी. तसेच पुढे कोणीही दारू पिताना किंवा पार्टी करताना आढळल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी,”
हरिश्चंद्र भोये, आमदार, विक्रमगड विधानसभा मतदारसंघ



0 Comments