Hot Posts

6/recent/ticker-posts

आदिवासींचा पाण्यासाठी जव्हार पंचायत समितीवर हंडा मोर्चा

“पाणी आमचं हक्काचं!”, “आमचं पाणी आम्हालाच द्या!” घोषणांनी जव्हार शहर दणाणलं ; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

जव्हार : तुळशीराम चौधरी 

जव्हार तालुक्यातील कोरतड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोरतड, दसकोड, देहेरे व आसपासच्या गावांतील शेकडो आदिवासी ग्रामस्थांनी सोमवारी पाण्यासाठी थेट जव्हार पंचायत समितीवर मोर्चा काढला. महिलांनी डोक्यावर हंडे घेऊन “पाणी आमचं हक्काचं!”, “आमचं पाणी आम्हालाच द्या!” अशा घोषणांसह जव्हार शहरात रॅली काढत प्रशासना विरोधात संताप व्यक्त केला. आदिवासी क्रांतिकारक चौकातून निघालेल्या या हंडा मोर्च्याने संपूर्ण शहरात घोषणांचा निनाद घुमवला.

गेल्या २५ वर्षांपासून रखडलेली पाणीपुरवठा योजना, अनुदान थकीत राहणे आणि ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे या भागात पाण्याचा प्रश्न चिघळला आहे. काही गावांना कधी काळी थोडं पाणी मिळालं असलं तरी अनेक गावांमध्ये आजही नळ कोरडेच आहेत. यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला आणि सोमवारी शेकडो महिला-पुरुषांनी जव्हार पंचायत समितीवर धडक देत आपला हक्क मागितला.

पूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अखत्यारीत असलेली योजना सध्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू आहे. मात्र या योजनेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी शासनाकडून एक रुपयाही निधी दिला गेला नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. तसेच मागील पाच वर्षांपासून विजेच्या बिलावरील ५० टक्के अनुदानही मिळालेले नाही. नवीन जलजीवन मिशन योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असून, ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचं ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिलं. जुन्या पाईपलाईनला गळती लागून पाणीपुरवठा ठप्प झाला असताना अभियंते आणि ठेकेदारांनी दुर्लक्ष केल्याचीही तक्रार ग्रामस्थांनी केली.

या मोर्च्याचं नेतृत्व सरपंच संदीप विष्णू माळी यांनी केलं. त्यांनी ग्रामस्थांसह गटविकास अधिकारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून ठोस मागण्या मांडल्या. यावेळी उपस्थित उपविभागीय अभियंता आर. सी. पाटील (म.जी.प्रा. उपविभाग, पालघर) यांनी लेखी आश्वासन दिलं. त्यानुसार, मंजूर प्रत्येक घरात नळजोडणी दोन महिन्यांत पूर्ण केली जाईल, जलकुंभाचं काम तांत्रिक पाहणी करून लवकर पूर्ण करण्यात येईल, तसेच मंजूर २५ एचपी पंपाऐवजी ५० एचपी (२ कार्यरत + १ राखीव) पंप बसविण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविला जाईल, असं लेखी आश्वासन देण्यात आलं.

या लेखी आश्वासनानंतर सरपंच संदीप माळी यांच्या अध्यक्षते खालील मोर्चा समितीने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. तथापि, ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला की “जर दोन महिन्यांत नळजोडणी आणि पाणीपुरवठ्याचं काम पूर्ण झालं नाही, तर पुढचा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला जाईल.”

या हंडा मोर्च्यात मोठ्या संख्येने महिला, युवक, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी आदिवासी बांधवांनी दाखवलेला लढाऊपणा संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. जव्हारसारख्या आदिवासी बहुल भागात आजही पाणीटंचाईचा प्रश्न कायम असून, शासनाने या आंदोलनाची गंभीर दखल घेऊन तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी सर्वसामान्यांची मागणी होत आहे.


Post a Comment

0 Comments