Hot Posts

6/recent/ticker-posts

Dahanu दापचरी चेकपोस्ट जवळ कारचा अपघात ; चार जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

 


डहाणू : प्रतिनिधी



    मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचरी चेकपोस्ट समोर बुधवारी सकाळी एका कारचा अपघात झाला. या अपघातात चालकासह चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.




    चारोटी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात बुधवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. एमएच ०१ ईआर ५७३५ या क्रमांकाची कार मुंबईकडून गुजरातकडे जात असताना दापचरी चेकपोस्ट परिसरात हा अपघात झाला. महामार्गावरील लहान वाहनांसाठी झिगझॅग पद्धतीने ठेवलेले सिमेंटचे बॅरिकेट लक्षात न आल्याने चालक परेश शहा (रा. मुंबई) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर आदळली.


    अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून कारमधील चालक आणि तीन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्ग पेट्रोलिंग टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना ॲम्बुलन्सच्या सहाय्याने रुग्णालयात हलवले. वेळीच मदत मिळाल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी काही काळ वाहतूक खोळंबा झाला होता. मात्र, अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास कासा पोलिस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments