तरुणांच्या तक्रारीनंतर गॅस सिलेंडरने भरलेला पिकअप टेम्पो तहसील कर्मचारी व पोलिसांच्या ताब्यात
जव्हार प्रतिनिधी : तुळशीराम चौधरी
जव्हार शहरात गेल्या काही दिवसांपासून नाशिक भागातून ‘ऋषिकेश एचपी गॅस एजन्सी’च्या नावाने अनधिकृतपणे हॉटेल व्यावसायिकांना कमी किंमतीत गॅस सिलेंडरची रोज विक्री केली जात असल्याचे काही तरुणांच्या लक्षात आले. यानंतर या तरुणांनी लगेचच जव्हार तहसील व पोलिसांना कळवून गॅस सिलेंडरने भरलेला टेम्पो त्यांच्या ताब्यात दिला. हा प्रकार शनिवार, २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी उघड झाला असून पुढील कारवाई चौकशी केल्यानंतरच केली जाईल, असे नायब तहसीलदारांनी सांगितले.
जव्हार शहरातील ठिकठिकाणी लहान-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना ‘ऋषिकेश एचपी गॅस एजन्सी’च्या नावाने गॅस सिलेंडरची सुरू असलेली अनधिकृत विक्री MH 05 BD 0573 या क्रमांकाच्या पिकअप वाहनातून केली जात असल्याचे काही व्यावसायिकांनी या तरुणांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर तरुणांनी तहसील व पोलिसांना कळवून पिकअप वाहन ताब्यात दिले आहे. पंचनामा करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती नायब तहसीलदारांनी दिली.
विशेष म्हणजे, गॅस सिलेंडरने भरलेला हा पिकअप टेम्पो आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहासह रहिवासी परिसरालगत बायपास रोडवरील रामा इन हॉटेलच्या मागे उभा केला जात होता. त्यामुळे वसतिगृहातील मुलांच्या आणि नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला होता. हा प्रकार काही तरुणांच्या लक्षात आल्यानंतर शनिवारी तहसील व पोलिसांना कळवून गॅसने भरलेला टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील चौकशी सुरू असल्याचे नायब तहसीलदारांनी सांगितले.
या अनधिकृत गॅस सिलेंडर विक्रीबाबत पालघर जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग यांनी चौकशी करून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. नोंदणीकृत भारत गॅस एजन्सीच्या संचालकांनी संबंधित व्यापाऱ्याला यापूर्वी अनेकदा सूचना दिल्याचे सांगितले. शनिवारी सकाळी शासकीय वसतिगृहाजवळ भरलेले सिलेंडर दिसल्यानंतर भारत गॅस एजन्सीने 112 पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून पाहणीची विनंती केली. या भागात अशा नावाने कोणतीही गॅस एजन्सी नसल्याचे भारत गॅस एजन्सीच्या मालकांनी स्पष्ट केले. घरगुती गॅससारख्या संवेदनशील वस्तूंची बेकायदेशीर विक्री हा गंभीर गुन्हा असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.
प्रतिक्रिया
जव्हार शहरात अनधिकृत गॅस सिलेंडर विक्री सुरू आहे. याकडे पुरवठा अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कारवाई करावी, नाहीतर पुढील जबाबदारी तहसील पुरवठा विभागाची असेल.
राजू भोये, माजी अध्यक्ष, युवा आदिवासी




0 Comments