Hot Posts

6/recent/ticker-posts

जव्हार नगरपरिषदेवरील राष्ट्रवादी - शिवसेनेची ‘वर्षानुवर्षांची’ सत्ता भाजप मोडीत काढणार ?

जव्हार नगरपरिषदेवरील राष्ट्रवादी - शिवसेनेची ‘वर्षानुवर्षांची’ सत्ता भाजप मोडीत काढणार ?

स्थानिक पातळीवर भाजपची जोरदार मोर्चेबांधणी ; राष्ट्रवादी व शिवसेनेचे वाढले ‘टेन्शन’

जव्हार : तुळशीराम चौधरी 

जव्हार नगरपरिषदेत अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ता आलटून-पालटून राहिली आहे. मात्र, आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होताना दिसत आहे. स्थानिक पातळीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे, जनतेत निर्माण झालेला विकासाचा उत्साह आणि बदलाची तीव्र इच्छा यामुळे या निवडणुकीत सत्तापालटाची स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. प्रचाराचा जोर दिवसेंदिवस वाढत असताना, वर्षानुवर्षांची राष्ट्रवादी – शिवसेनेची सत्ता भाजप ‘मोडीत’ काढणार की काय ? असे चित्र निर्माण झाले असून, यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.

जव्हार नगरपरिषद ही संस्थानिक मुकणे राजे यांच्या काळातील असून शंभर वर्षे पार केलेली नगरपरिषद आहे. गेल्या अनेक दशकांपासून या नगरपरिषदेवर प्रथम राष्ट्रवादी आणि त्यानंतर शिवसेना अशा दोन्ही पक्षांनी आलटून-पालटून सत्ता भोगली आहे.

यंदाच्या निवडणुकीत भाजपने प्रचार आघाडी घेत राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना अक्षरशः घाम फोडला आहे. यामुळे जव्हार नगरपरिषदेवरील राजकीय गणिते बदलू लागली असून, राष्ट्रवादी व शिवसेनेला मोडीत काढत भाजपच वरचढ ठरत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

जव्हार नगरपरिषद हद्दीतील महत्त्वाच्या समस्या आजही कायम आहेत. खडखड धरण पाण्याचा प्रश्न, नगरपरिषद हद्दीतील रस्त्यांची दुर्दशा, तसेच स्वच्छ-सुंदर शहरात घाणीने भरलेली गटारे अशा शेकडो समस्या आणि अडचणींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. अनेक मूलभूत सुविधांचा प्रश्न, शहरातील पायाभूत विकासाचा ठप्प झालेला वेग, गट-तटातील राजकारण आणि भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांमुळे लोकांच्या मनात असंतोष वाढत गेला आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपने शहरात वेगाने पकड निर्माण केली आहे. तरुण मतदार, बॅनरबाजी, महिला बचत गट आणि वंचित समाज हे वर्ग मोठ्या प्रमाणावर भाजपच्या बाजूने झुकत असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे. 'जव्हारचा सर्वांगीण कायापालट' हा मुख्य मुद्दा भाजपने नागरिकांसमोर मांडला आहे.

स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, रस्ते-विकास, रोजगाराच्या संधी या सर्व क्षेत्रांत भाजपने ठोस आणि आश्वासक योजना मांडल्यामुळे जनतेचा पाठिंबा वेगाने वाढताना दिसत आहे. यामुळे भाजपने प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून, मतदारांच्या चर्चेत भाजपच बाजी मारणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेला जोरदार टक्कर मिळाल्याने त्यांचे टेन्शन वाढत चालले आहे. मात्र, पुढील चित्र निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल हे निश्चित.

Post a Comment

0 Comments